मुरादाबाद - विरोधी पक्षाकडे ना नेता आहे, ना निती आहे, स्वार्थासाठी एकत्र येऊन या पक्षांनी आघाडी केली. या लोकांना कोणताही विचार नाही. धोरण नाही. नेतृत्वहिन आघाडी आहे. ही आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अमित शहा हे भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला संबोधित करत होते.
यावेळी अमित शहा म्हणाले की, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएसोबत आगामी निवडणुकीत उतरली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि विरोधी नेते आघाड्या घेऊन पुढे आहे. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर आमचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील हे आमचे ठरलेलं आहे. मात्र तुमचे नेतृत्व कोण आहे? देशात मौनीबाबा मनमोहन सिंग यांचे सरकार नाही तर नरेंद्र मोदी यांचे सरकार हवंय.
पाकिस्तानच्या घरात घुसून आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचं काम भाजपा करत आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पूर्ण देश आक्रोशात होता. पाकिस्तानकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलं पाकिस्तानला मोदी सरकारची भिती वाटत होती त्यांना वाटत होतं की पुन्हा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल मात्र मोदींनी हवाई स्ट्राइक करत पाकिस्तानला जोरदार धडा शिकवला. आपल्या सीमेशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. एअर स्ट्राइकनंतर देश आनंदात होता तर काँग्रेसचे मंडळी दुख: व्यक्त करत होती असंही अमित शहा म्हणाले.
शत्रू गोळी चालवत असेल तर गोळीनेच उत्तर दिले जाईल हे भारतीय जनता पार्टीचे धोरण आहे. देशाच्या सैन्यावर गौरव करणे ही आमची पार्टी आहे तर तुम्ही पुरावे मागत आहे. पाकिस्तानचा मिडीया पहा, मग तुम्हाला समजेल मोदींनी पाकिस्तानसोबत काय केलं आहे. देशातील जवानांवर संशय व्यक्त करताय हा देशातील शहीदांचा अपमान आहे असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला. दहशतवाद्यांनी जशास तसं उत्तर देणारा पंतप्रधान हवा, 30 वर्ष तुम्ही दहशतवाद्यांना बिर्याणी खायला देत होता मात्र आता हे दिवस गेले. आता पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरेल असा नेता हवा. नरेंद्र मोदीशिवाय देशाचे नेतृत्व करेल असा नेता कोणीच नाही असंही अमित शहा यांनी सांगितले.