प्रा. वामन केंद्रे, नाट्य प्रशिक्षक-दिग्दर्शकलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता मोठमोठ्या प्रचार सभा होत आहेत. नेत्यांमध्ये जुगलबंदी लागेल. भाषणांना रंग चढेल. भाषणाने लोकांना प्रभावित करण्याची कला काही नेत्यांना अवगत आहे. भारदस्त, कणखर आवाज, बोलण्याची शैली, लहेजा याद्वारे ते लोकांवर प्रभाव पाडत असतात. आवाज हे माणसाचं सर्वात शक्तिशाली शस्त्र आणि प्रभावी शास्त्र आहे. हे एखाद्या ॲटमबॉम्बपेक्षा शक्तिशाली आहे. मात्र आपल्याकडे आवाजाबाबत पुरेशी जागरुकता नाही. आवाजावर काम केलं जात नाही. आवाज श्रवणीय हवा. कर्कश बोलणाऱ्याच्या आवाजाला किंवा कानांना त्रास होणाऱ्या आवाजाला टिंबर म्हटलं जातं. असा आवाज आला की लोक दूर पळतात. आवाज श्रवणीय करण्यासाठी तसेच आवाजातील दोष दूर करण्यासाठी तीन-चार महिने प्रशिक्षण घेता येऊ शकतं. ‘व्हॉईस ॲण्ड स्पीच’वर जगभरात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. १६ एप्रिलला जागतिक आवाज दिन साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त या विषयाचा आढावा घेऊ या...
एकदा उच्चारलेला शब्द मागे घेता येत नाही. तो कोणाचा किती आरपार छेद घेऊ शकेल याचा अंदाज बांधणं शक्य नाही. त्यामुळे शरीर, आवाज आणि मन ही मानवाची जगण्याची तीन आयुधं आहेत. मार्लिन ब्रँडोपासून ज्युलिया रॉबर्टपर्यंत अनेकांना संभाषण करायला शिकवणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या शिक्षिका सेसिली बेरी यांच्याकडे मला अडीच महिने शिकता आलं, हे माझं सुदैव आहे. डॉ. अशोक रानडेंच्या सहवासात आवाजावर रिसर्च करता आला. मराठवाड्यातील असल्याने सुरुवातीला माझ्या बोलण्यात तिथल्या बोलीचा लहेजा होता. लोक हसायचे, पण मी आवाजाचा ध्यास घेत प्रशिक्षण घेतलं. एखाद्या व्यक्तीला प्रमाण भाषेसोबत चार बोलीभाषा येत असतील तर त्याच्याइतका श्रीमंत माणूस दुसरा कोणी नाही.
आरोह-अवरोह म्हणजेच चढ-उतार हा आवाजातील एक वेगळाच मंत्र आहे. ज्या वक्त्याला हा मंत्र समजला तो तास न् तास श्रोत्यांना खिळवून ठेवू शकतो. उत्तम आशय-विषयाच्या जोडीला भारदस्त आवाजामुळे व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. आपण काय बोलतो ते अगोदर स्वत:ला समजलं पाहिजे. त्यानंतर ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता वाढीस लावली पाहिजे. लोकांचं तुमच्याकडे लक्ष देणं किंवा न देण्याचं मूळ कारण आवाज आहे. प्रभावी बोलणारा माणूस, नेता, वक्ता, शिक्षक, डॉक्टर, वकील यशस्वी होतो. न्यायालयात वकील केवळ आपल्या आवाजाच्या चढ-उताराने खटल्यावर प्रभाव टाकू शकतो.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आवाजाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. बरीच संभाषणं फोनवरून होत असल्याने तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे सादर करण्यासाठी आवाजाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे पातळ आवाज असलेल्या व्यक्तीला फार कोणी महत्त्व देत नाही. याउलट अमिताभ बच्चन, हरिष भीमानी तसेच दिवंगत अमिन सयानी यांच्या आवाजात वेगळाच पोत आहे. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानात आवाज हे रोजी- रोटीचं साधन बनला आहे. अँकर, रेकॉर्डिस्ट, डबिंग आर्टिस्ट,आरजेच्या रूपात करियर करता येतं. आवाजाची दुनिया खूप मोठी आहे.
कोणता आवाज कानांना सुखावतो?- घुमारेदारपणा असणाऱ्यांचा आवाज कानांना सुखदायी वाटतो. दिवंगत पं. भीमसेन जोशींनी फक्त सूर लावला तरी तो ऐकत राहावं असं वाटायचं. कारण त्यांच्या आवाजातील घुमारेदारपणा खूप स्ट्राँग होता. - छाती, स्वर यंत्र, नाक, कान आणि घशातील पोकळी आवाजाला मोठं करतात. त्यावर मेहनत घ्यावी लागते. उच्चार महत्त्वाचे असतात. काही जण शेवटचा शब्दच उच्चारत नाहीत. बरेचसे टेलिव्हिजन स्टार शेवटचा शब्दच उच्चारत नाहीत. त्यामुळे त्यांचं बोलणं अर्धवट वाटतं. स्वत:चं ऐकत बोलणाऱ्यांचं बोलणं प्रभावी होतं. - बोलण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या पडजिभेपासून ओठांपर्यंत आणि टाळूपासून दातांपर्यंतच्या अवयवांचा व्यायाम करून त्यांच्यात लवचीकपणा आणावा लागतो. तुम्ही कितीही वेगात बोलला तरी उच्चारण शास्त्राप्रमाणे एक अक्षरही वाकडं उच्चारलं जाता कामा नये.
खालची आणि वरची पट्टी...- आवाजावर संस्कार करताना आवाज काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय हे लक्षात घ्यायला हवं. याची सुरुवात श्वसनापासून होते. याला दम सास म्हटलं जातं. फुप्फुसांना पूर्ण श्वास दिला जात नसेल तर बोलण्यात प्रभावीपणा येणार नाही. - एखाद्याचा आवाज स्ट्राँग असतो, म्हणजे त्याचा दम सास शक्तिशाली असतो. आवाजाचे चढ-उतार करण्यासाठी व्यायाम आहेत. यासाठी रोज रियाज करत वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये आवाज खेळता ठेवावा लागतो. सर्वात खालची आणि वरची पट्टी वाढवण्यासाठीही सहा महिने, वर्षभर मेहनत घ्यावी लागते.