राजस्थानमधील लोकसभेच्या 25 पैकी 12 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. याच दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी पाली लोकसभा मतदारसंघातील भोपाळगड विधानसभा मतदारसंघात पोहोचले. एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "राहुल बाबा दर तीन महिन्यांनी सुट्टीसाठी थायलंडला जातात" असं म्हटलं आहे.
"पाली टेक्सटाईलसाठी देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. तुम्ही आणि मी जेव्हा बाजारात कपडे खरेदीसाठी जातो तेव्हा कपडे आधी नीट पाहतो. त्याचप्रमाणे पंतप्रधानपदासाठी उमेदवार पाहून मतदान करा. एकीकडे 23 वर्षांपासून रजा न घेता भारत मातेची सेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे दर तीन महिन्यांनी थायलंडला सुट्टीवर जाणारे राहुल बाबा आहेत."
"गेल्या 2019 च्या निवडणुकीत 303 जागा दिल्या होत्या. भोपाळगडसह संपूर्ण देशातील जनतेसमोर दोन पर्याय आहेत. एका बाजूला 55 वर्षे चार पिढ्या राज्य करणारं गांधी घराणं, तर दुसऱ्या बाजूला करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी. एकीकडे काँग्रेस पक्ष आहे ज्याने 12 लाख कोटींचा घोटाळा केला आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्यावर 23 वर्षात एक पैसाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही"
"एकीकडे 'गरीबी हटाओ'चा नारा देऊन सत्ता उपभोगणारे राहुल बाबा आणि कंपनी आहेत, तर दुसरीकडे 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे काँग्रेस पक्ष आहे, ज्याने दहशतवाद आणि नक्षलवादाला शिखरावर नेले आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हेच दहशतवाद संपवत आहेत. मला विमानतळावर सांगण्यात आले की, तापमान खूप वाढत आहे, तेव्हा मी विमानतळ अधिकाऱ्याला सांगितलं की, जितका तापमानाचा आलेख वर जाईल तितका भाजपाच्या जागांचा आलेखही वाढेल" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.