प्रसाद कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, भुवनेश्वर: ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित होत आहे. ओडिशामधील लोकसभा निवडणुकीमधील मतदानाचा चौथा आणि अखेरचा टप्पा येत्या १ जून रोजी पार पडणार आहे. सर्व पक्षांनी या टप्प्यांतील मतदारसंघांत आपली ताकद पणाला लावली आहे. भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्यातच प्रामुख्याने तुंबळ लढत असेल.
एक जून रोजी मयूरभंज (एसटी प्रवर्गासाठी राखीव), बालासोर, भद्रक, जजपूर (एससी प्रवर्गासाठी राखीव), केंद्रापारा, जगतसिंगपूर (एससी प्रवर्गासाठी राखीव) या मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. याबरोबरच ४२ विधानसभा मतदारसंघांतही निवडणुका पार पडतील. या टप्प्यांत लोकसभेसाठी ६६, तर विधानसभेसाठी ३९४ उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत, तर मुख्यमंत्री नवीन पटनायक, व्ही. के. पांडियन बीजेडीसाठी मतदारसंघांमध्ये जोर लावला आहे. बालासोरमध्ये काँग्रेस, भाजप आणि बीजेडी यांच्यात चुरस आहे. श्रीकांत जेना, प्रताप सारंगी, लेखश्री समंतसिंघर आपापले नशीब अजमावतील.
कळीचे मुद्दे काय?
- जजपूर येथून काँग्रेसचे अंचल दास, भाजपचे रवींद्रनारायण बेहरा आणि बीजेडीकडून शर्मिष्ठा सेठी रिंगणात आहेत. केंद्रापारा येथून काँग्रेसचे सिद्धार्थ स्वरूप दास, भाजपचे वैजयंत पांडा आणि बीजेडी अंशुमन मोहंती यांच्यात तुंबळ लढत होत आहे.
- जगतसिंगपूर येथून काँग्रसचे रवींद्रकुमार सेठी, भाजपचे बिभू प्रसाद तराई आणि बीजेडीच्या राजश्री मलिक यांच्यात विजयासाठी चुरस आहे. नागरी समस्या, स्थानिक पातळीवरील सुरक्षा, संवेदनशील भाग, जातीय तणाव यासारखे कळीचे मुद्दे निवडणुकीमध्ये आहेत; पण मुद्यांपेक्षा भावनिकतेला आवाहन केले जात आहे.
कुटे यांच्या निलंबनाची चर्चा
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री पटनायक यांचे विशेष सचिव डी. एस. कुटे आणि सुरक्षाप्रमुख आशिषकुमारसिंह यांचे निलंबन केले आहे. या निलंबनावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निलंबन दुर्दैवी असल्याचे बीजेडीने म्हटले आहे.
२०१९च्या निवडणुकांतील स्थिती
पक्ष २०१९ विधानसभा २०१९ लोकसभा
बिजू जनता दल ११३ १२भाजप २३ ८काँग्रेस ९ १--------------------------------------------------------एकूण जागा १४७ २१