दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळाल्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालभाजपावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. एका मुलाखतीत ते म्हणाले की, भाजपा आम आदमी पक्षाच्या उदयाला घाबरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने असे आरोप होत आहेत. याशिवाय गरज पडली तर जेलमधूनही सरकार चालवू, असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल हे देशाचे पहिले मुख्यमंत्री आहेत जे पदावर असताना जेलमध्ये गेले आहेत. ते म्हणाले, "देश अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे. हळूहळू आणि आता अतिशय वेगाने देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्यांनी (केंद्रातील भाजपा सरकारने) आधी (झारखंडचे माजी मुख्यमंत्री) हेमंत सोरेन यांना अटक केली आणि नंतर मला अटक केली. केजरीवाल यांना खोट्या खटल्यात अटक करू शकत असाल तर त्यांनी त्यांना घाबरावे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागावे, असा संदेश ते देशवासीयांना देत आहेत."
"सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की, मी राजीनामा का देत नाही. लोक माझ्यावर खुर्चीला चिकटून राहिल्याचा आरोप करतात. मी कधीच खुर्ची किंवा पदाचा लोभ दाखवला नाही. मी आयकर आयुक्त असताना माझी नोकरी सोडली आणि दहा दिवस दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये काम केलं."
"यावेळी मी राजीनामा देत नाही कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. त्यांना (भाजप) असं वाटतं की, की ते केजरीवालांना दिल्लीत पराभूत करू शकत नाहीत. आम्हाला एका वेळी 67 जागा मिळाल्या, तर दुसऱ्या वेळी 62 जागा. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांना खोट्या खटल्यात अडकवले जेणेकरून त्यांचे सरकार पाडता येईल, जर मी आज राजीनामा दिला तर ते ममता बॅनर्जी आणि पिनाराई विजयन यांचे सरकार पाडतील."
"जिथे भाजपा हरेल, त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना अटक करून त्यांचे सरकार पाडले जाऊ शकते. ही लढाई लढावी लागेल. जर त्यांनी लोकशाहीला जेलमध्ये टाकले, तर लोकशाही जेलमधून चालेल. आम्ही पूर्ण ताकदीने याविरोधात लढू. मला किती काळ जेलमध्ये ठेवायचं आहे, याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात" असं देखील अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.