समाजवादी पक्ष मेरठमधून पुन्हा उमेदवार बदलणार असल्याच्या वृत्तावर आमदार अतुल प्रधान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मेरठच्या जागेवर अतुल प्रधान यांच्या जागी पक्ष सुनीता वर्मा यांना तिकीट देत असल्याचं म्हटलं जात आहे. तिकीट कापलं जाण्याच्या चर्चेवर अतुल प्रधान यांनी "तिकीट कापलं तर आमदार पदाचा राजीनामा देईन" असं म्हटलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टीने अतुल प्रधान यांना कार्यालयात बोलावले, जिथे अखिलेश यादव यांनी मेरठमधून निवडणूक न लढवण्याबाबत सांगितलं आहे. यावर अतुल प्रधान यांनी तिकीट कापल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. ट्विटरवर पोस्ट करताना अतुल प्रधान म्हणाले, "राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचा निर्णय आहे तो मान्य आहे! लवकरच सहकाऱ्यांशी बसून बोलू."
अतुल प्रधान सरधना मतदारसंघातून आमदार आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते संगीत सोम यांचा पराभव केला होता. यापूर्वी या जागेवर उमेदवार बदलताना सपाने भानूप्रताप यांच्या जागी अतुल प्रधान यांना तिकीट दिलं होतं. अशा स्थितीत या जागेवरून उमेदवार बदलण्याच्या वृत्ताने अतुल प्रधान पुन्हा एकदा नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे.
रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेते अरुण गोविल यांना भाजपाने मेरठ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. यूपीच्या मेरठ लोकसभा जागेसाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आग्रा लोकसभा जागेसाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे.