लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाने पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी गुरुवारी तेलंगणात जाहीर सभेला संबोधित करताना, 2024 ची निवडणूक ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांची निवडणूक आहे, ही निवडणूक जिहादच्या विरोधात मतदानासाठी आहे असं म्हटलं आहे.
तेलंगणातील भोंगीर येथे झालेल्या जाहीर सभेतील भाषणात महाराणा प्रताप यांची आठवण करून देत अमित शाह म्हणाले की, "मुघलांविरुद्ध लढणाऱ्या महाराणा प्रताप यांचा आजच्या दिवशीच जन्म झाला होता. मी त्यांना सलाम करतो. यावेळची निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांची निवडणूक आहे. ही निवडणूक जिहाद विरोधात, विकासाला मत देण्याची आहे.
"ही निवडणूक म्हणजे राहुल गांधींच्या चायनीज गॅरंटी विरुद्ध मोदीजींच्या भारतीय गॅरंटीची निवडणूक आहे. निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर आम्ही 200 च्या जवळ पोहोचलो आहोत." तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर निशाणा साधताना "रेवंत रेड्डी ऐका, यावेळी तेलंगणात आम्ही 10 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत आणि तेलंगणात डबल डिजिट मोदीजींना 400 पार नेणार आहेत" असंही म्हटलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी याआधी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा आरोप केला होता. एलन मस्कची कंपनी टेस्ला तेलंगणात गुंतवणूक करू इच्छित होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना येथे येण्यापासून रोखलं. या दोघांनी मस्क यांच्यावर गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणला होता असं म्हटलं होतं.