Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (26 मार्च) पश्चिम बंगालच्या संदेशखली अत्याचाविरोधात आवाज उठवणारी पीडित रेखा पात्रा, यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. विशेष बाब म्हणजे, भारतीय जनता पक्षाने रेखा यांना संदेशखलीच्या बशीरहटमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. फोनवर पीएम मोदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, रेखा पात्रा यांना शक्तिचे स्वरुप असे वर्णन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पीएम मोदींनी रेखा यांना त्यांच्या निवडणूक प्रचाराबाबत प्रश्न विचारले. या संवादादरम्यान रेखा पात्रा यांनी पंतप्रधानांना संदेशखली भागातील महिलांवरील अत्याचाराची माहिती दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बशीरहट मतदारसंघातून रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना या जागेवरुन तिकीट दिले आहे. या जागेवरुन विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
रेखा पात्रा संदेशखली चळवळीचा चेहरा 24 मार्च 2024 रोजी आलेल्या भाजप उमेदवारांच्या पाचव्या यादीत रेखा पात्रा यांचे नाव होते. त्यांना राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रेखा पात्रा संदेशखलीतील महिला चळवळीचा चेहरा आहेत. त्यांनी या भागातील महिलांविरोधातील अत्याचाराला वाचा फोडली होती. आता भाजपने त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने आतापर्यंत पश्चिम बंगालमधील 42 पैकी 38 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.