Mamata Banerjee On BJP : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे चार टप्पे झाले असून, तीन टप्पे बाकी आहेत. नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सातत्याने सुरू आहेत. अशातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीका केली. 'भाजप सरकार कायम टिकणार नाही, आज नाही तर उद्या मी नक्कीच बदला घेणार,' असा धमकी वजा इशारा त्यांन दिला.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये आपला पराभव करण्यासाठी निवडणूक निकाल बदलण्यात आल्याचा आरोपही केला. त्या म्हणाल्या, 'मी तुम्हाला विधानसभा निवडणुकीदरम्यान नंदीग्रामबद्दल सांगितले आहे. माझी फसवणूक झाली, मते लुटली गेली, हेराफेरी झाली. निवडणुकीपूर्वी डीएम, एसपी, आयजी बदलण्यात आले आणि निवडणुका संपल्यानंतर लोडशेडिंग करुन निकाल बदलले. भाजपचे सरकार कायम राहणार नाही. ईडी, सीबीआय नेहमी त्यांच्यासोबत नसतील. मी आज ना उद्या बदला नक्की घेईन,' असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस आणि सीपीआयएमला मतदान न करण्याचे आवाहनयासोबतच त्यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला काँग्रेस आणि सीपीआयएमला मतदान न करण्याचे आवाहन करत या दोन्ही पक्षांचे लोक भाजपकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, 'सीपीआयएम आणि काँग्रेस बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी भाजपचा पैसा वापरत आहेत. त्यांना एक मतही देऊ नका. आमच्या पक्षाचा आघाडीशी संबंध नाही. केंद्रात इंडियाचे सरकार आल्यावर बाहेरुन पाठिंबा देऊ, पण राज्यात आम्ही सोबत नाही,' असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.