काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या अमेठी आणि रायबरेलीच्या निवडणूक प्रचारात सतत व्यस्त असून त्यांच्या आक्रमक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुद्द्यांवर बोलत नाहीत असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. यावर आता अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी पलटवार करत आव्हान दिलं आहे. काँग्रेस स्वतः मुद्द्यांपासून दूर पळत आहे. कोणामध्ये किती हिंमत आहे हे तुम्हाला कळेल असं म्हटलं आहे.
प्रियंका गांधी यांच्या विधानाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी खुलं आव्हान दिलं आणि म्हणाल्या, "आज माझं या सर्वांना आव्हान आहे... तुम्ही तुमचं चॅनल ठरवा, अँकर ठरवा... मुद्दा ठरवा... ठिकाण ठरवा... तारीख ठरवा. ... दोन्ही भाऊ-बहीण एका बाजुला आणि भाजपाचे एक प्रवक्ते दुसऱ्या बाजूला... दूध का दूध, पानी का पानी, कोणामध्ये किती हिंमत आहे हे कळेल."
"काँग्रेस पक्षच स्वत: मुद्द्यांपासून दूर पळत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मुद्द्यांवर बोला, चॅनलला सांगा, रिपोर्टरला सांगा… ठिकाण सांगा… तारीख सांगा… मुद्दा सांगा. सुधांशू त्रिवेदीजी आमच्या पक्षाकडून पुरेसे आहेत. दोन्ही भाऊ-बहीण एका बाजूला आणि त्रिवेदीजी दुसऱ्या बाजूला... सर्वांना सगळंच समजेल" असं म्हणत स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा हाती घेतल्यापासून येथील राजकारण तापलं आहे. ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या प्रश्नावर प्रियंका गांधींनी भाजपावर लोकांची दिशाभूल करण्यासाठी खोटारडेपणाचा आरोप केला. पंतप्रधान मोदींना महागाई, रोजगार आणि गरिबी यांसारख्या मुद्द्यांवर राहुल गांधींसोबत चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे.