Prashant Kishor Prediction For LokSabha: लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. अशातच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या निवडणुीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी तृणमूल काँग्रेसपेक्षा चांगली असेल, असे मोठे विधान पीके यांनी केले आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला होता, तरीदेखील ममता बॅनर्जींच्या टीएमसीचे वर्चस्व कायम राहिले.
एका मुलाखतीदरम्यान प्रशांत किशोर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला टीएमसीपेक्षा जास्त जागा मिळतील. ईशान्य आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्येही भाजपच्या जागा वाढतील, पण 370 जागा जिंकण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न अपूर्ण राहील, असेही प्रशांत किशोर म्हणाले. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे NDA ला यंदाही फायदा होत असल्याचे पीके यांचे म्हणने आहे.
प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार 400 हून अधिक जागा जिंकणे NDAसाठी अवघड आहे, पण भाजप पश्चिम बंगालमध्ये मोठा चमत्कार करू शकतो. पश्चिम बंगालमध्ये नक्कीच भाजपला टीएमसीपेक्षा जास्त जागा मिळतील. बंगालशिवाय बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्येही भाजपच्या जागा वाढतील. पूर्वीप्रमाणे यंदाही पीएम मोदींच्या लोकप्रियतेचा भाजपला फायदा होईल. याशिवाय, विरोधकांच्या चुकांमुळेही भाजपचा फायदा झाल्याचे पीके यांचे म्हणने आहे.