मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्ष लोकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन विधानं करत आहेत. याच दरम्यान देवास-शाजापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सभेला संबोधित केलं. "मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळणार पगार हा गरीब आणि गंगा मातेच्या सेवेसाठी समर्पित केला आहे" असं म्हटलं.
देवास जिल्ह्यातील सोनकच्छ येथे बुथस्तरीय कार्यकर्ता परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या भाषणात ही मोठी गोष्ट सांगितली. मुख्यमंत्री म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी सर्वकाही समर्पित केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना मिळणारा पगार ते दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करायचे. गरीब विद्यार्थ्यांची शाळा आणि महाविद्यालयाची फी भरायचे"
"पंतप्रधान झाल्यावर त्यांना मिळणारा पगार ते गंगा मातेच्या सेवेसाठी समर्पित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिधान केलेल्या कपड्यांचा आणि त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून जी रक्कम जमा होते ते ती गंगा मातेच्या सेवेसाठी देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचं घर देखील नाही" असंही मोहन यादव यांनी म्हटलं आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मुकेश नायक म्हणाले की, "राज्यातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी य़ावर 2024 च्या लोकसभा निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पक्ष नेहमीच निवडणुकीत मुद्दे भडकवण्याचा प्रयत्न करते. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आपल्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावरून लक्ष भरकटवत आहेत. राजकारणात दिखावा आणि वास्तव यात खूप फरक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांच्या लिलावाशी मध्य प्रदेशातील बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांचा काय संबंध? याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी करावा."