राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सुमारे 400 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नागौर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासोबत (आरएलपी) गेल्याने जागा आरएलपीसाठी रिक्त ठेवली आहे. काँग्रेसने नागौरचे खासदार आणि आरएलपी प्रमुख हनुमान बेनिवाल यांना येथे उमेदवारी दिली आहे.
बेनिवाल यांच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी नागौरमधील भाजपा उमेदवार ज्योती मिर्धा यांच्या बाजूने प्रचार केल्याबद्दल काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. माजी आमदार भाराराम, कुचेरा नगरपालिकेचे अध्यक्ष तेजपाल मिर्धा आणि सुखाराम डोडवाडिया यांच्या निलंबनानंतर नागौरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. निलंबनाचा निषेध करत काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
तेजपाल मिर्धा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत नागौरमध्ये काँग्रेस मजबूत स्थितीत होती. आठपैकी चार जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीतही तिची स्थिती तितकीच मजबूत होती. असं असूनही, आरएलपीसोबत का गेले? नागौरमध्ये हनुमान बेनिवाल काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा व्यक्तीसोबत गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस हायकमांड हे स्थानिक काँग्रेस प्रदेश युनिटच्या संमतीशिवाय आरएलपीसोबत गेले आहेत. ही गोष्ट आमच्यावर लादण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आरएलपीने कंबर कसली होती. आम्ही भाजपासोबत कधीही मंच शेअर केला नाही. तरीही बेनिवाल यांनी आमची पक्षातून हकालपट्टी केली. कोणतीही माहिती किंवा कारणे दाखवा नोटीस न देता काँग्रेसने थेट तुघलकी फर्मान काढून आमची हकालपट्टी केली असंही म्हटलं आहे.