निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, भारताच्या निवडणुकांवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. मतदारांची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, देशात एकूण मतदारांची संख्या 96.8 कोटी आहे. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला आहेत. यावेळी 1.82कोटी मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. याच दरम्यान काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.
"लोकशाही आणि राज्यघटना यांना हुकूमशाहीपासून वाचवण्याची कदाचित ही शेवटची संधी असेल" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "2024 च्या लोकसभा निवडणुका भारतासाठी ‘न्यायाचे दरवाजे’ उघडतील.लोकशाही आणि राज्यघटना यांना हुकूमशाहीपासून वाचवण्याची कदाचित ही शेवटची संधी असेल. द्वेष, लूट, बेरोजगारी, महागाई आणि अत्याचाराविरुद्ध आपण भारताचे लोक एकत्र लढू. हाथ बदलेगा हालात" असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीसाठी 27 एप्स आणि पोर्टल तयार
निवडणुकीच्या तयारीची माहिती देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 1.5 कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात. यावेळीही निवडणूक घेण्याची जबाबदारी याच लोकांच्या खांद्यावर असेल, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी 27 एप्स आणि पोर्टल तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती cVigil एपद्वारे दिली जाऊ शकते आणि तत्काळ कारवाई केली जाईल.
97 कोटी मतदार, 55 लाख EVM
राजीव कुमार म्हणाले की, नोंदणीकृत मतदारांची संख्या अंदाजे 97 कोटी आहे. 10.5 लाख मतदान केंद्रे आहेत जिथे मतदान होणार आहे. 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाईल, तर अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 4 लाख वाहनांचा वापर केला जाईल. यावेळी 1.8 कोटी मतदार प्रथमच मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 19.47 कोटी आहे. देशात 12 राज्ये अशी आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे.