Lok Sabha Elections 2024 : खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बुधवारी (24 एप्रिल 2024) पक्षाने वलीउल्लाह समीर यांच्या नावाची घोषणा केली. वलीउल्लाह समीर सध्या हैदराबाद काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
हैदराबादसोबतच काँग्रेसने करीमनगर मतदारसंघातून वलीचला राजेंद्र राव आणि खमाम मतदारसंघातून रामसहयाम रघुराम रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
हैदराबादमध्ये ओवेसींचे वर्चस्व
हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा दक्षिण भारतातील हॉट सीटपैकी एक आहे. सध्या तेथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. मागील अनेक दशकांपासून हैदराबादमध्ये ओवेसी घराण्याची सत्ता आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी 2004 ते 2019 पर्यंत, सलग चार वेळा ही जागा जिंकली आहे. यापूर्वी त्यांचे वडील सहावेळा तेथून खासदार होते.
हैद्राबादमध्ये तिहेरी लढत...या जागेवर ओवेसी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने (भाजप) फायरब्रँड नेत्या माधवी लता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हैदराबादमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे असदुद्दीन ओवेसींचा पराभव करणे सोपी बाब नाही. आता काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. मुस्लिम मतांमध्ये फूट पडल्यामुळे ओवेसींची मते कमी होऊ शकतात.
हैदराबादमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान हैदराबादमध्ये चौथ्या टप्प्यात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, तर निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होईल.