पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली. विरोधक आता अदानी-अंबानी या विषयावर का बोलत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधत निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड सांगितला आहे. तसेच त्यांनी मोदी यांच्या अदानी-अंबानींबद्दलच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. वेळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिला नाही, अशा शब्दांत खरगेंनी मोदींच्या विधानाचा समाचार घेतला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी लिहिले की, वेळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिला नाही. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधान आपल्याच मित्रांवर हल्ला करणारे झाले आहेत. मोदीजींची खुर्ची डगमगत असल्याचे समोर येत आहे. हा निकालांचा खरा ट्रेंड आहे. खरे तर तेलंगणामध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले होते की, पाच वर्षे राजपुत्र अदानी-अंबानींच्या माळा जपायचे, त्यांच्यावर टीका करायचे. पण जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून त्यांनी त्यांची नावे घेणे बंद केले आहे.
दरम्यान, बुधवारी तेलंगणातील करीमनगर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला विचारले की, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून अंबानी आणि अदानी यांची नावे घेणे का थांबवले? काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी त्या उद्योगपतींकडून किती पैसे मिळाले आहेत. गेली ५ वर्षे काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्यापासून या उद्योगपतींच्या नावाने माळ जपत होते. पाच वर्षे एकच जपमाळ जपत होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी आणखी म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधकांनी अंबानी आणि अदानींना शिव्या देणे बंद केले आहे. आज मला तेलंगणाच्या भूमीवरून काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांना अदानी आणि अंबानींकडून किती संपत्ती मिळाली? काळ्या पैशाने भरलेली पोती मिळाली का? अंबानी आणि अदानींना शिव्या देणे रातोरात थांबवले असा कोणता व्यवहार झाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे.