नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी तामिळनाडूमधील ४० जागांवर काँग्रेस आणि डीएमके यांच्यात एकमत झाले आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, डीएमके प्रमुख स्टॅलिन यांच्याशी झालेली चर्चा अतिशय सौहार्दपूर्ण होती. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील जागावाटपाबाबत त्यांच्यासोबत सहमती झाली आहे. तामिळनाडूतील ४० पैकी ९ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. त्याचवेळी काँग्रेस पुद्दुचेरीतील एका जागेवर निवडणूक लढवणार आहे.
याचबरोबर, काँग्रेस राज्यातील उर्वरित सर्व जागांवर द्रमुक आणि सहयोगी पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देईल, असेही केसी वेणुगोपाल यांनी सांगितले. चेन्नईतील द्रमुकच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम स्टॅलिन आणि काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याशिवाय मुकुल वासनिक, काँग्रेसचे माजी खासदार अजॉय कुमार आदी प्रमुख उपस्थित होते.
काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरकाँग्रेसने काल (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण ३९ उमेदवारांची नावे आहेत. या यादीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधींना काँग्रेसने वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. २०१९ साली त्यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून तिकीट दिले आहे.