नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा पाच 'न्याय' आणि 25 'गॅरंटी'वर आधारित असणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पक्षाच्या मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. तसेच, 6 एप्रिल रोजी जयपूर आणि हैदराबादमध्ये जाहीरनाम्याशी संबंधित जाहीर सभा आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा जयपूरमध्ये आयोजित जाहीरनामा-संबंधित रॅलीला संबोधित करतील. राहुल गांधी हैदराबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सामायिक न्याय, किसान न्याय, महिला न्याय, श्रमिक न्याय आणि युवा न्याय या पाच तत्त्वांवर पक्षाचा जाहीरनामा आधारित असणार आहे.
'युवा न्याय' अंतर्गत पक्षाने ज्या पाच गॅरंटीची चर्चा केली आहे. त्यामध्ये 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि तरुणांना एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत 1 लाख रुपये देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे. पक्षाने 'सामायिक न्याय' अंतर्गत जात जनगणना करण्याची आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करण्याची गॅरंटी दिली आहे. तसेच, 'किसान न्याय' अंतर्गत, पक्षाने किमान आधारभूत किंमत (MSP), कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि जीएसटी मुक्त शेतीला कायदेशीर दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे.
याचबरोबर, 'श्रमिक न्याय' अंतर्गत काँग्रेसने कामगारांना आरोग्याचा अधिकार, किमान वेतन 400 रुपये प्रतिदिन आणि शहरी रोजगार हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, 'महिला न्याय' अंतर्गत 'महालक्ष्मी' गॅरंटीद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्यासह अनेक आश्वासने दिली आहेत.
भाजपाचा वचननामा पुढील आठवड्यात?भाजपाते वचननाम्याच्या समितीची दुसरी बैठक गुरुवारी होत असून 'मोदी की गॅरंटी'चा सविस्तर तपशील तयार केला जात असल्याचे समजते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख असून पहिल्या बैठकीमध्ये देशभरातून आलेल्या हजारो सूचनांवर चर्चा करण्यात आली. भाजपाच्या वचननाम्यात 'विकसित भारता'वर अधिक भर देण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी मोठी आश्वासने दिली जाऊ शकतात.