Lok Sabha Elections 2024: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. पित्रोदा यांच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून, आता काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. अशातच, काँग्रसने भाजप खासदार जयंत सिन्हा यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते याच वारसा कराबाबत बोलताना दिसत आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जयंत सिन्हा यांचा जुना व्हिडीओ शेअर करत म्हटले, 'वारसा कर' लागू करण्याची काँग्रेसची कोणतीही योजना नाही, पण राजीव गांधींनी 1985 मध्ये इस्टेट ड्युटी रद्द केली होती. आता एकदा नरेंद्र मोदी सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री आणि नंतर अर्थविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष असलेले भाजप खासदार जयंत सिन्हा यांचे विधान ऐका. त्यांनी अमेरिकेप्रमाणे 55% वारसा कराच्या बाजूने वक्तव्य केले आहे. पंतप्रधानांनी यावर उत्तर द्यावे.
जयंत सिन्हा काय म्हणाले व्हिडिओ पाहा:
पवन खेडा यांची अमित मालवीय यांच्यावर टीका
काँग्रेसचे प्रवक्ते आणि मीडिया-प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करताना सोशल मीडियावर लिहिले - अमित मालवीय यांना याबद्दल पश्चाताप होत असेल की, त्यांनी हे जुने ट्विट का डिलीट केले नाही?
सॅम पित्रोदांच्या कोणत्या विधानावरुन सुरू झाला वाद?सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेच्या वारसा कराचा उल्लेख केला. त्यांच्या मते यूएसमध्ये 55% वारसा कर आहे. सरकार वारसा हक्काने आलेल्या संपत्तीपैकी 55% स्वतःकडे ठेवते. मालमत्ता लोकांसाठी सोडली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे 100 मिलियन डॉलर्सची संपत्ती असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर मुलांचा 45% मालमत्तेवर अधिकार असतो, तर 55% संपत्तीवर सरकारचा अधिकार असतो. भारतात असा कोणताही कायदा नाही. अशा मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. आम्ही अशा धोरणांबद्दल बोलत आहोत, जे लोकांच्या हिताचे आहेत.