Rahul Gandhi On Agniveer Scheme: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी देशभरात प्रचार करत आहेत. दरम्यान, आज(19 मे) त्यांनी अत्यंत महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जाहीर सभा घेतली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादवही त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशात भाजप फक्त एक जागा जिंकेल, असा टोला राहुल यांनी लगावला.
'अग्नवीर योजना कचऱ्यात फेकणार'राहुल गांधींनी लष्करातील भरती प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निवीर योजनेबाबत भाष्य केले. आमचे सरकार आल्यावर अग्नीवीर योजना कचऱ्यात फेक आणि त्यांना कायमस्वरुपी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, आम्ही हळूहळू गरीब आणि बेरोजगार लोकांच्या खात्यात पैसे जमा करू, असेही ते म्हणाले.
'संविधान वाचवण्याची लढाई'ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. भाजप आणि आरएसएसचे लोक सातत्याने संविधानावर हल्ले करत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोणतीही शक्ती राज्यघटना नष्ट करू शकत नाही. भाजप आणि नरेंद्र मोदींनी फक्त उद्योगपती मित्रांसाठी काम केले, पण आमचे सरकार आले तर आम्ही गरिबांसाठी काम करू, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
'करोडो करोडपती निर्माण करणार'राहुल पुढे म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 लोकांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही करोडो लोकांना करोडपती बनवणार आहोत. गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये जमा करू. शेतकऱ्यांना MSP देऊन त्यांची कर्जे माफ केली जातील. प्रत्येक शिक्षित तरुणाला नोकरी दिली जाईल. मनरेगा अंतर्गत मजुरांचे वेतन 250 वरुन 400 रुपये करू, असे आश्वासनदेखील राहुल गांधींनी दिले.