ओडिशातील बरहामपूरमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदी म्हणाले की, "निवडणुकीनंतर भाजपा येथे डबल इंजिन सरकार बनवेल. बीजेडी सरकारची एक्सपायरी डेट 4 जून 2024 आहे. ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील."
नवीन पटनायक यांच्या निकटवर्तीय पक्षाचे नेते व्हीके पांडियन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये पांडियन हे नवीन पटनाईक यांना विचारतात की, भाजपा ओडिशात सरकार स्थापन करेल असं म्हणत आहे का? यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हसत हसत म्हणाले की, भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची भाषा आणि संस्कृती समजणाऱ्या मुख्यमंत्र्याची गरज आहे असं म्हटलं होतं. भाषेवर पटनाईक यांची कमकुवत पकड असल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, जी व्यक्ती जगते, समजून घेते आणि संस्कृती आणि परंपरेचा अभिमान बाळगते ती ओडिशाच्या समस्या जलद गतीने सोडवण्यास मदत करू शकते.
"तुम्ही काँग्रेसला 50 वर्षे आणि बीजेडीला 25 वर्षे दिली आहेत. भाजपाला फक्त पाच वर्षे द्या. आम्ही ओडिशाला देशातील नंबर वन राज्य बनवू. 10 जून रोजी होणाऱ्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी मी येथे आलो त्याच दिवशी आम्ही आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करू, ज्याला नवीन पटनायक सरकार विरोध करत आहे" असंही मोदींनी सांगितलं.
मोदींच्या दाव्यावर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय व्हीके पांडियन म्हणाले की, नवीन पटनायक 9 जून रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान सलग सहाव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.