हिमाचल प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कंगना रणौतने बुधवारी जिल्हा मंडी अंतर्गत करसोग विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. यावेळी कंगना म्हणाली की, “इंडिया आघाडी हे विषारी मिश्रण आहे. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी आहेत.”
“नरेंद्र मोदींचे नावही भगवान विष्णूच्या नावावर आहे. अशा परिस्थितीत, असं म्हणता येईल की, ते भगवान विष्णूचे अंश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राम मंदिराचीच स्थापना केली नाही तर प्रभू रामाचे चरित्रही स्थापित केले आहे. प्रभू रामाचे चरित्र अफाट आहे. पंतप्रधान देखील रामाच्या अंशाचे प्रतीक आहेत. मोदींनी महिलांच्या हितासाठी अशी अनेक मोठी कामं केली, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील महिला शक्तीची काळजी आहे. मोदींनी मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे केलं. मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी ट्रिपल तलाकचा अंत केला. याशिवाय नारी शक्ती वंदन कायद्यांतर्गत निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.”
“मी हिरोईन म्हणून नाही तर सेवक म्हणून लोकांसमोर आली आहे. इंडिया आघाडीचे नेते महिलांचा आदर करत नाहीत. ते महिलांचा रेट विचारतात. जे महिलांचा आदर करू शकत नाहीत, ते महिलांसाठी काय काम करणार? ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे आणि पंतप्रधानांनी मंडीमध्ये आपला चेहरा म्हणून माझी निवड केली आहे” असं देखील कंगना राणौतने म्हटलं आहे.