काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा या हरियाणाच्या सिरसा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शैलजा यांनी गुरुवारी सांगितलं की, गेल्या 10 वर्षात डबल इंजिन सरकारने शेतकरी आणि मजुरांना डबल झटका दिला आहे. शैलजा म्हणाल्या की, भाजपाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले नाही.
कुमारी शैलजा भाजपाच्या अशोक तंवर यांच्या विरोधात लढत आहेत. अशोक तंवर यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. "हे कसलं डबल इंजिन सरकार आहे, ज्यात शेतकरी, मजूर आणि गरिबांना डबल झटका बसला आहे. आज समाजातील कोणताही घटक आवाज उठवतो, त्याच्यावर लाठीचार्ज केला जातो. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांना एका वर्षाहून अधिक काळ कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करावे लागले होते."
"केंद्रातील मोदी सरकारने देशात दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आतापर्यंत 20 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या, पण सरकारचे आश्वासन खोटं ठरलं. आज ना तरुणांना रोजगार मिळत आहे, ना त्यांच्याकडे आशा आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपावर हल्लाबोल करताना कुमारी शैलजा यांनी भाजपावर फूट पाडून राजकारण केल्याचा आरोपही केला.
"भाजपा आपल्या संविधानाशी खेळत आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही" असं शैलजा यांनी म्हटलं आहे. महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याने भाजपालाही धारेवर धरले आणि सांगितलं की, काँग्रेसच्या कार्यकाळात घरगुती गॅसची किंमत 400-500 रुपये होती आणि आज एलपीजीची किंमत गगनाला भिडली आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातून अमली पदार्थांची समस्या संपुष्टात येईल, असं आश्वासन शैलजा यांनी दिलं.