आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत त्यांनी निशाणा साधला आहे. खोटी आश्वासनं दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. "झूठ का अंबार- मोदी सरकार, झूठ का दरबार- मोदी सरकार" असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी खोचक टीका केली आहे.
"नोकऱ्यांवर खोटं, इतिहासावर खोटं, विकासावर खोटं, आश्वासनांमध्ये खोटं, प्रत्येक गोष्टीत खोटं, प्रत्येक विचारात खोटं, येथे खोटं, तेथे खोटं, उजवीकडे खोटं, डावीकडे खोटं, घराणेशाहीवर खोटं. इतकं खोटं कोण बोलतं? जनतेने मोदी सरकारचं खोटं पुसून टाकायचं ठरवलं आहे" असं ट्विट करत लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान मोदी गुरुवारी बिहार दौऱ्यावर आले होते. बिहारमधील जमुई येथे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेला संबोधित केले. जमुईची जागा चिराग पासवान यांच्या खात्यात आहे. गुरुवारी तेजस्वी यादव यांनी पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी ट्विटरवर अनेक पोस्ट केल्या होत्या. घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर काहीही बोलले नाही.
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह लोकसभेच्या रिंगणातही पोहोचला आहे. बिहारमधील सारण मतदारसंघातून मुलगी रोहिणी आचार्य यांना लालूंनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यावरुन त्यांची मोठी सून ऐश्वर्या या नाराज असून त्या नणंदेलाच आव्हान देऊ शकतात.
कौटुंबिक न्यायासाठी ऐश्वर्या राय यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता त्या राजकीय न्याय मिळविण्यासाठी लालूंच्या कुटुंबीयांसमोर आव्हान निर्माण करु शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनीही तसे संकेत दिले आहेत. लालूंची मुलगी जिथून निवडणूक लढविणार, तेथे त्यांची सूनही प्रतीक्षेत असेल, असे सिन्हा म्हणाले होते.