I.N.D.I.A Alliance PM Face : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत. तर, 4 जून रोजी सर्व निकाल जाहीर होतील. दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी NDA चे नेतृत्व करत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनी अद्याप आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवलेला नाही. अशातच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल मोठा दावा केला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांना विरोधकांकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का, असे विचारले असता ते म्हणाले की, "उमेदवाराच्या नावाची घोषणा एका प्रक्रियेनुसार केली जाईल. पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणे म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नाही. आमचा पक्ष लोकशाही आधारित आहे. एखादा व्यक्ती महत्वाचा नाही, पक्ष महत्वाचा आहे. कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला जनादेश मिळेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. पक्ष ज्याला निवडेल, तोच नेता पंतप्रधान होतो."
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
"सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."ते पुढे म्हणाले, "2004 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा अवघ्या 4 दिवसांत झाली होती. यावेळी 4 दिवसही लागणार नाहीत. पंतप्रधानांच्या नावाची घोषणा 2 दिवसांत होईल. खासदार एकत्रितपणे उमेदवाराची निवड करतील. ही एक प्रक्रिया आहे, आम्ही शॉर्टकट घेणार नाहीत. ती मोदींची कार्यशैली आहे, आम्ही त्यांच्याप्रमाणे अहंकारी नाही. सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार पंतप्रधान असेल, 2004 मध्येही तेच झाले होते," अशी घोषणा जयराम रमेश यांनी केली आहे.