पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा या नादिया जिल्ह्यातील एका निवडणूक रॅलीमध्ये एकत्र नाचताना पाहायला मिळाल्या आहेत. महुआ मोईत्रा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि "निवडणूक प्रचाराची आतापर्यंतची सर्वात मजेदार क्लिप" असं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी नादिया जिल्ह्यातील तेहट्टा येथे मोइत्रा यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित केलं. यावेळी दोघी जणी महिलांसह एकमेकींचा हात धरून ढोलताशांच्या तालावर नाचत होत्या. ट्विटर अकाऊंटवर केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये महुआ मोइत्रा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला पाठिंबा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आणि "धन्यवाद दीदी" असंही म्हटलं.
रॅलीत बोलताना, ममता बॅनर्जी यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आणि दावा केला की समान नागरी संहिता (यूसीसी) एससी, एसटी आणि ओबीसींच्या अधिकारांना धोका पोहोचवू शकते. गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी मालदा येथील स्थानिक कलाकारांसोबत बंगाली लोकगीतांच्या तालावर नाचताना दिसल्या होत्या. तसेच लोक वाद्य देखील वाजवून पाहिलं होतं
तृणमूल काँग्रेसने महुआ मोइत्रा यांना कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकसभेत पैसे घेतल्याबद्दल आणि प्रश्न विचारल्यामुळे त्या खूप चर्चेत होत्या. महुआ मोइत्रा यांचा माजी सहकारी जय अनंत देहाद्राई, यांनी त्यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता.