ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उस्मानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील करतार नगरमध्ये कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या काही लोकांनी हल्ला केला. कन्हैया कुमार यांच्याकडे जात आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच दरम्यान भाजपा उमेदवार मनोज तिवारी यांनी यावर भाष्य केलं आहे.
मनोज तिवारी यांनी 'झी मीडिया'शी बोलताना सांगितलं की, "असं होऊ नये. लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावा. मला असं वाटतं की, ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात. कारण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ते ज्यांच्याही घरी जातात किंवा कोणासोबत फिरायला जातात तेव्हा नातेवाईकांचे फोन येतात की, तुम्ही देशद्रोहीसोबत का फिरत आहात? मी एक उमेदवार आहे आणि मला असं वाटतं की कन्हैया कुमार यांना उमेदवार झालेलं म्हणून बघून लोकांना राग आला आहे. त्याच रागामुळे काँग्रेसही तुटली आहे."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कन्हैया कुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. यावेळी काही लोक हार घेऊन येतात, ते हार घालण्यासाठी जातात आणि ते घालण्यापूर्वीच त्यांच्यावर हल्ला केला जातो. याच दरम्यान एक तरुण त्यांना जमिनीवर पाडतो. मात्र, गर्दीमध्ये उपस्थित असलेले कन्हैया कुमार यांचे समर्थक त्या तरुणाला लगेच पकडतात.
दिल्लीत लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत, ज्यासाठी 25 मे रोजी मतदान होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसने या जागेवरून कन्हैया कुमार यांना उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. या जागेवर दोघांमध्ये चुरशीची लढत असल्याचं म्हटलं जात आहे. कन्हैया यांनी जेएनयूमधून राजकारणाला सुरुवात केली.