Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:54 IST2024-05-23T15:38:31+5:302024-05-23T15:54:49+5:30
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Congress : लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील महेंद्रगड येथे पोहोचले. याच दरम्यान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील महेंद्रगड येथे पोहोचले. याच दरम्यान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेसचे सरकार 7 जन्मातही येणार नाही. काँग्रेसला दिलेलं प्रत्येक मत वाया जाईल" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
इंडिया आघाडीवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, "गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी इंडिया आघाडीतील लोकांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत. पाच वर्षांत पाच पंतप्रधान होतील, असं सांगितलं जात आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान, हरियाणाचे लोक पाच हजार विनोद बनवतील. इंडिया आघाडीचे लोक अत्यंत जातीयवादी, घराणेशाहीवाले आहेत."
"मला राजकारणाची समज हरियाणा आणि पंजाबमधूनही मिळाली. मी हरियाणामध्ये 1995 मध्ये आलो. मी येथील माता-भगिनींच्या हातचे अन्न खाल्लं आहे. आता मोदींना तुमचं हे कर्ज फेडण्यासाठी खूप काम करायचं आहे. आपल्या हरियाणाला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठीच पुन्हा एकदा मोदी सरकार गरजेचं आहे."
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले, "काँग्रेसने देशाची फाळणी केली. त्यांनी एक भारत, दोन मुस्लिम राष्ट्रे निर्माण केली आणि आता उरलेल्या भारतावरही मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे इंडिया आघाडीतील लोक म्हणत आहेत. ते आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीमध्ये समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, "रॅलीतील गर्दी आणि उत्साह हे स्पष्टपणे दर्शविते की सपा-काँग्रेसची इंडिया आघाडी ही पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण देश एकच गोष्ट म्हणत आहे, पुन्हा एकदा मोदी सरकार. काल मी एक व्हिडीओ पाहत होतो, ज्यामध्ये लोक स्टेजवर धावत आणि चढत होते."
"व्हिडीओ पाहून मी विचारलं, हा गोंधळ का सुरू आहे? तर त्यांनी सांगितलं की, सपा आणि काँग्रेसचे लोक रॅलीत लोकांना आणण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात. प्रति व्यक्ती पैसे देतात, पण त्यांनी पैसे दिले नाहीत, म्हणून लोक धावत येऊन स्टेजवर चढले. आता अशी स्थिती असलेला पक्ष तुमचं भलं कसं करू शकेल?" असंही मोदींनी म्हटलं आहे.