पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसच्या राजकुमारांना वायनाडमध्ये संकट दिसत आहे. त्यांना जसं अमेठीतून पळून जावं लागलं तसंच वायनाड सोडावं लागेल" असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.
महाराष्ट्रातील नांदेड येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काल देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ज्यांनी मतदान केलं, विशेषत: ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्यांचं मी अभिनंदन करतो. मतदानानंतर बूथ स्तरापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेलं विश्लेषण आणि जी माहिती मिळत आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान झाल्याचा विश्वास पक्का होत आहे."
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. इंडिया आघाडीमधील लोक आपला भ्रष्टाचार वाचवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कसे एकत्र आले आहेत हे मतदारही पाहत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडिया आघाडीला पूर्णपणे नाकारल्याचे वृत्त आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं.
"परिस्थिती अशी आहे की, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या लोकांना उमेदवारच मिळत नाहीत. त्यांचे नेते बहुतांश जागांवर प्रचाराला जात नाहीत. हे काँग्रेस कुटुंब स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसलाच मतदान करणार नाही, कारण ते जिथे राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. ज्या कुटुंबावर काँग्रेस चालते तेच कुटुंब काँग्रेसला मत देऊ शकणार नाही" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.