2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करताना तामिळनाडूत गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींनी बुधवारी तामिळनाडूतीलकाँग्रेस आणि द्रमुक यांच्यावर त्यांच्या कच्चातिवू आणि 'शक्ती' टीकेवरून निशाणा साधला आहे. काँग्रेसचा खरपूस समाचार घेत पंतप्रधान मोदी यांनी "काँग्रेसचे युवराज शक्तीचा अपमान करतात आणि ते शक्ती नष्ट करण्याबाबत बोलले आहेत" असं म्हटलं आहे.
वेल्लोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, "मला नेहमीच वेल्लोरबद्दल आदर वाटतो. तामिळनाडू ही शक्तीची पूजा करणाऱ्यांची भूमी आहे. इंडिया आघाडीचे लोक शक्तीचा अपमान करतात, काँग्रेसचे युवराज शक्ती नष्ट करण्याबाबत बोलले आहेत. हे लोक राम मंदिरावर बहिष्कार टाकतात. डीएमके आणि इंडिया आघाडीचे लोक महिलांचा अपमान करतात."
"डीएमकेने तामिळनाडू आणि देशातील मुलांनाही सोडलं नाही. शाळकरी मुलंही ड्रग्जच्या आहारी गेली आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे डीएमके कुटुंबाशी संबंध आहेत. डीएमकेपक्षाचे राजकारण फूट पाडा आणि राज्य करा यावर आधारित आहे. हे लोक लोकांना आपापसात भांडायला लावतात. डीएमकेच्या या घातक राजकारणाचा पर्दाफाश करत राहीन असा निर्धारही मी केला आहे."
"काशी तमिळ संगम असो, सौराष्ट्र तमिळ संगम असो, लोकांना तमिळ संस्कृतीची ओळख व्हावी हा माझा प्रयत्न आहे. काशीचा खासदार आहे. मी तुम्हाला तिथे येण्याचे आमंत्रण देतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी गुजरातचा आहे, इथेही बरेच गुजराती राहतात. गुजराती असल्याने मी तुम्हाला गुजरातला भेट देण्याचे निमंत्रण देतो. यूएनमध्येही मी तामिळमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना कळेल की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. डीएमकेचं सत्य हे आहे की त्यांनी संसदेत सेंगोलच्या स्थापनेला विरोध केला होता" असंही मोदींनी म्हटलं आहे.