आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांचं मोठं विधान आता समोर आलं आहे. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मीसा भारती यांनी मनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, "जर जनतेने संधी दिली आणि इंडिया आघाडी सरकार स्थापन झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपा नेत्यांपर्यंत सर्वजण जेलमध्ये असतील."
"आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत बोलतो. जेव्हा आपण एमएसपी लागू करण्याबद्दल बोलतो तेव्हा या लोकांना तुष्टीकरण वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवारवादावर का बोलत नाहीत? आता तोंड बंद झालं का? जेव्हा ते येतात तेव्हा आमच्या कुटुंबावर आरोप करतात" असंही मीसा भारती यांनी म्हटलं आहे.
मीसा भारती यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्यासह रामकृपाल यादव यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विजय कुमार सिन्हा म्हणाले की, जे घाबरले आहेत त्यांचे आवाज बाहेर येत आहेत. हे ते लोक आहेत जे शिपायाच्या क्वार्टरमध्ये राहत होते. आता महालात राहत आहेत.
पाटलीपुत्र जागेवरील एनडीएचे उमेदवार रामकृपाल यादव यांनी आव्हान देताना म्हटलं आहे की, "तुरुंगात पाठवणाऱ्यांनी सर्वप्रथम स्वत:ची काळजी घ्यावी. स्वत:ला वाचवावं. 40 वर्षांपासून राजकीय जीवनात असलेले रामकृपाल यादव, जे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले, दोन वेळा विधानसभेचे सदस्य राहिले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना जेलमध्ये पाठवून दाखवा. आमच्या एफिडेविटनंतर कोणतीही मालमत्ता नाही."