लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे आहेत. मालदा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, "सकाळपासून लोक उत्साहात आणि जल्लोषात लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत. तुमचं प्रेम, तुमचा उत्साह मी आनंदाने पाहत आहे."
"तुम्ही सर्वजण इतकं प्रेम देत आहात की असं वाटतं, मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो किंवा पुढच्या जन्मी बंगालच्या आईच्या कुशीत जन्म घेणार आहे. माझ्या नशीबात मला इतकं प्रेम कधीच मिळालं नाही. एक काळ असा होता की बंगाल हे भारताच्या विकासाचे इंजिन होतं. मग ती सामाजिक सुधारणा असो, वैज्ञानिक कामगिरी असो किंवा इतर कोणतेही रेकॉर्ड असो."
"बंगालने नेतृत्व केले नाही असे कोणतेही क्षेत्र नव्हते. पण आधी डावे पक्ष आणि आता तृणमूल काँग्रेसने या राज्याचे मोठेपण उद्ध्वस्त करून विकासाची गाडीही थांबवली आहे. बंगालमध्ये टीएमसीच्या राजवटीत एकच गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे हजारो आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे. ममता सरकारने राज्यातील विकास थांबवला आहे. इथे फक्त घोटाळ्यांचं राज्य आहे" असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
"जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; मोदींचं मतदारांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः तरुण आणि महिला मतदारांनी उत्साहाने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान म्हणाले, "जितकं जास्त मतदान होईल, तितकी आपली लोकशाही मजबूत होईल" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.