गुजरातमधील आणंद येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, "काँग्रेस इथे मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान रडत आहे. पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवं आहे, जसं 2014 पूर्वीचे सरकार होतं, असे सरकार ज्याच्या अंतर्गत मुंबईत दहशतवादी हल्ले शक्य होते."
"ज्या वर्षांमध्ये आपल्या देशात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात पाकिस्तान मोठा झाला होता. आता पाकिस्तानच्या दहशतवादाचे टायर पंक्चर झाले आहे. एकेकाळी दहशतवाद्यांची निर्यात करणारा देश आता पीठ आयात करण्यासाठी दारोदार फिरत आहे, ज्यांच्या हातात एकेकाळी बॉम्ब होता, त्यांच्या हातात आज भीकेचा कटोरा आहे. काँग्रेसचं कमकुवत सरकार दहशतवादाच्या सूत्रधारांना कागदपत्रे देत असे, पण मोदींचं मजबूत सरकार दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारतं."
रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "योगायोग बघा, आज भारतात काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. गंमत म्हणजे इथे काँग्रेस मरत आहे आणि तिथे पाकिस्तान रडत आहे. आता पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी पाकिस्तान राजपुत्राला पंतप्रधान करण्यासाठी उतावीळ झाला आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसमधील ही भागीदारी आता पूर्णपणे उघड झाली आहे."
"आज लोक विचारत आहेत की काँग्रेस इतकी वेडी का झाली आहे. आज काँग्रेस ही बनावट फॅक्टरी म्हणजेच बनावट मालाची फॅक्टरी बनली आहे. काँग्रेस मोहब्बत की दुकान म्हणत खोटा माल का विकतंय? काँग्रेसला कधीही एससी आणि एसटीची चिंता नाही. तर 90 च्या दशकापूर्वी काँग्रेस ओबीसी आरक्षणाच्या अर्थात बक्षीपंच आरक्षणाच्या बाजूनेही नव्हती. ओबीसी आयोग आणि बक्षीपंच आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा, असे ओबीसी समाज वर्षानुवर्षे सांगत आहे. काँग्रेसने त्यांचं ऐकलं नाही" असंही मोदींनी म्हटलं आहे.