पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेएमएम आणि काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. झारखंडमधील पलामू येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदींनी निशाणा साधला आहे. "मला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून देशवासियांची सेवा करत असताना आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. मोदींवर एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप लागला नाही. जेएमएम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अमाप संपत्ती निर्माण केली पण माझ्याकडे ना सायकल आहे ना घर आहे."
"राजकारण आणि संपत्ती हे सर्व ते आपल्या मुलांसाठी कमवत आहेत पण मोदींना हे कोणासाठी ठेवायचं आहे, ना पुढे काही ठेवलं आहे, ना मागे काही राहिलं आहे. तुमची मुलं आणि तुमची नातवंडं हीच माझी वारस आहेत. माझी इच्छा आहे की, तुमच्या मुलांना वारसा म्हणून विकसित भारत द्यावा, जेणेकरून तुम्हाला कधीही त्रासदायक जीवन जगावं लागणार नाही. मोदींच्या अश्रूंमध्ये काँग्रेसचा राजपुत्र त्याचा आनंद शोधतो आहे" असं म्हणत पंतप्रधानांनी हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत नरेंद्र मोदी म्हणाले की, "ते सांगत आहेत की, ते तुमचा एक्स-रे करत आहेत. त्यानंतर ते तुमच्याकडून काही हिस्सा हिसकावून घेतील आणि त्यांच्या व्होट बँकेला देतील. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आणखी एक धोकादायक गोष्ट सांगितली आहे. या लोकांना आता एचसी, एसटी आणि ओबीसींची मतं हिसकावून घ्यायची आहेत."
"दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय"
"काँग्रेसच्या काळात येथे बॉम्बस्फोट व्हायचे आणि दिल्ली सरकार शांततेच्या आशेने पाकिस्तानला प्रेमपत्रं पाठवत असे. पाकिस्तानात गेलेले प्रत्येक पत्र त्यांनी तिथून अनेक दहशतवाद्यांना पाठवले आणि देशात रक्ताची होळी झाली. तुमच्या मताने माझ्यात इतकं बळ भरलं की मी येताच म्हटलं की हा खेळ आता चालणार नाही. नवीन भारत घरात घुसून मारतो. सर्जिकल स्ट्राईकच्या थप्पडने पाकिस्तान हादरला. पूर्वी दहशतवादी हल्ल्यांनंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान जगभर रडत आहे. आज पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी प्रार्थना करत आहेत पण सशक्त भारताला आता मजबूत सरकार हवे आहे. मोदी सरकार हे मजबूत सरकार असल्याचं आता सर्वजण म्हणत आहेत" असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे