Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोरही वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी हिमाचल प्रदेशातील नाहान येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक पत्रकारांनी पंतप्रधान मोदींना कठोर प्रश्न विचारले नसल्याचा आरोप केला आणि त्यांना पुन्हा एकदा 'चमचा' म्हटले. याआधीही दिल्लीतील एका जाहीर सभेत राहुल यांनी अनेक पत्रकारांना चमचा म्हटले होते.
यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवरुन त्यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “आजकाल नरेंद्र मोदींच्या मुलाखती सुरू आहेत, ते चार चमचे बसवतात अन् ते प्रश्न विचारतात की, मोदीजी, तुम्ही आंबे कसे खाता? सोलून खाता की चोखून खाता?” मग मोदीजी उत्तर देतात की, मला माहित नाही, सर्व काही आपोआप घडते, देव मला मार्गदर्शन करतो. मी भारतातील एकमेव व्यक्ती आहे, ज्याचा देवाशी थेट संपर्क आहे. यावर चमचे म्हणतात व्वा, व्वा मोदीजी, काय मस्त बोललात. तुम्ही मीडियामध्ये शेतकऱ्यांबद्दल कधीच ऐकले नसेल, पण अंबानींचे लग्न नक्कीच पाहिले असेल. नरेंद्र मोदींनी देशात 22 अब्जाधीश निर्माण केले, आम्ही देशात करोडो करोडपती निर्माण करणार आहोत," असं राहुल म्हणाले.
काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी लढा दिला
“ज्या व्यक्तीचा देवाशी थेट संबंध आहे, त्याला संविधानाची काय गरज? ते थेट देवाशी बोलतात. मला तर थोडी भीती वाटते आहे. मला त्याला विचारायचे आहे की, मोदी जी, तुम्हाला जी काही भावना येते, ती सकाळी, संध्याकाळी की 24 तास असते?" असा टोलाही राहुल यांनी मोदींना लगावला. ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि जनतेच्या सोबतीने देशाला संविधान दिले. आपण खोलवर पाहिले तर संविधानाचे विचार हजारो वर्षे जुने आहेत. मात्र भाजपचे लोक या संविधानावर हल्ला करत आहेत. ते संविधान बदलणार असल्याचे उघडपणे सांगतात."
प्रियांका गांधी काय म्हणाल्या?यावेळी प्रियंका गांधी यांनीदेखील सरकारवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, "भारतात शेतकऱ्यांचा आदर करण्याची परंपरा आहे. पण मोदी सरकारने 'किसान सन्मान'ला केवळ आश्वासने दिली. हे सरकार ना शेतकऱ्यांचा आदर करते, ना त्यांच्या फायद्याचे बोलते. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, शेतीशी संबंधित गोष्टींवर जीएसटी लावण्यात आला. मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे आणले तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकरी दिल्लीबाहेर बसून राहिले, 700 हून अधिक शेतकरी शहीद झाले, पण ते झुकले नाही. शेतकऱ्यांना दहशतवादी आणि देशद्रोही म्हटले, पण नरेंद्र मोदींनी त्यांचे एकदाही ऐकले नाही. यूपीमध्ये निवडणुका होणार असताना हे कायदे मागे घेण्यात आले."
प्रियंका गांधींचे सरकारला प्रश्न..."मोदी सरकार शेतकऱ्यांचा आदर करत नाही. नरेंद्र मोदींनी जनतेचाही अनादर केला. निवडणुकीच्या व्यासपीठावरुन ते सार्वजनिक प्रश्नांवर बोलत नाहीत. आज देशात फक्त काँग्रेस पक्षच जनतेबद्दल बोलत आहे. लोकांचा आवाज ऐकण्यासाठी राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते महाराष्ट्रात चालत गेले. सरकार जनतेसाठी चालवले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. नरेंद्र मोदी मोठ्या व्यासपीठावर म्हणतात - देश प्रगती करत आहे, अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. असे असेल तर.. करोडो तरुण बेरोजगार का? देशात 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी का? महागाई इतकी का वाढत आहे? येथे पोलाद उत्पादन का ठप्प झाले?" असे सवाल प्रियंका गांधींनी सरकारला विचारले.