पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः तरुण आणि महिला मतदारांनी उत्साहाने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान म्हणाले, "जितकं जास्त मतदान होईल, तितकी आपली लोकशाही मजबूत होईल" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
हिंदी आणि इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये पोस्ट करून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. "लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व जागांच्या मतदारांनी आज विक्रमी मतदान करावं ही माझी नम्र विनंती आहे. जितकं जास्त मतदान होईल तितकी आपली लोकशाही अधिक मजबूत होईल. तरुण मतदारांसह नारी शक्तीला देखील माझा विशेष आग्रह आहे की त्यांनी मतदान करावं. तुमचं मत तुमचा आवाज आहे" असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 88 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. यामध्ये केरळमधील लोकसभेच्या सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 8, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, बिहारमधील 5, छत्तीसगडमधील 3, पश्चिम बंगालमधील 3, त्रिपुरा, मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी एका जागेवर आज मतदान होत आहे.
यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे. 4 जून रोजी निकाल घोषित केला जाईल. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशामधील विधानसभांचा कार्यकाळही जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे.