काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज गुजरातमधील बनासकांठा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधींना राजपुत्र संबोधल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांच्यावर सम्राटासारखं जीवन जगल्याचा आरोप केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, "ते माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात. मला त्यांना सांगायचं आहे की, हे राजकुमार 4000 किलोमीटर चालले आहेत. तुमच्या समस्या ऐकण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेले."
"माझ्या बंधू, भगिनी, शेतकरी आणि मजुरांना भेटले. सगळ्यांना प्रेमाने भेटून तुमच्या काय अडचणी आहेत, तुमच्या आयुष्यात कोणत्या समस्या आहेत आणि त्या कशा सोडवता येतील हे त्यांनी सर्वांना विचारलं आहे आणि एका बाजूला तुमचे सम्राट आहेत... नरेंद्र मोदी. महालात राहतात. तुम्ही टीव्हीवर कधी त्यांचा चेहरा पाहिला आहे का? अगदी स्वच्छ आणि नीटनेटका पांढरा कुर्ता, धुळीचा एकही डाग नाही. इकडे किंवा तिकडे एक केसही नाही. त्यांना तुमची मजुरी, तुमची शेती कशी समजणार? तुम्ही ज्या दलदलीत आहात ते कसं समजणार? तुम्ही महागाईने भरडले आहात. सर्वत्र महागाई, माझ्या बहिणींनो... तुम्ही भाजी घ्यायला जाता, मिळते का? तिचा भाव किती आहे?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टोला लगावला आहे.
महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, "माझ्या शेतकरी बांधवांनो, पेट्रोल आणि डिझेलचे भाव काय आहेत? तुम्ही कसं जगत आहात? प्रत्येक शेतीच्या मालावर जीएसटी आहे. प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. माझ्या बहिणींनो, कुठलाही सण असला की... काही खरेदी करावी लागते... मुलांसाठी नवीन कपडे, गणवेश घ्यावा लागतो, फी भरावी लागते, कोणी आजारी पडतं तेव्हा उपचार करावे लागतात? असं होतं तेव्हा तुमची काय अवस्था होते हे मोदींना कळत नाही."
प्रियंका गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "जेव्हा हे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्याचा अर्थ त्यांना तुमचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षांत लोकांचे अधिकार कमी करण्याचे काम केले आहे. पूर्वीचे पंतप्रधान गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या ऐकत असत. गुजरातने पंतप्रधान मोदींना सर्व काही दिले, सत्ता दिली. पण आता तुम्ही त्यांना पाहता, ते मोठ्या लोकांमध्ये दिसतात, परंतु शेतकरी किंवा गरीबांमध्ये कधीही दिसणार नाहीत. त्यांच्या वाराणसी मतदारसंघातही त्यांनी एकाही गरीबाच्या घराला भेट दिलेली नाही.
"लाखो शेतकरी पंतप्रधानांच्या घरापासून 4 किमी दूर आंदोलन करत असले तरी ते त्यांना भेटायला जात नाहीत. निवडणुका येत आहेत आणि मतं मिळत नाहीत हे कळल्यावर ते कायदा बदलतात. इथे राजपूत समाजाच्या महिलांचा किती अपमान झाला, PM मोदींनी काय केलं... उमेदवार काढून टाकला? तुमचं ऐकलं का? आम्हाला संधी मिळाली तर आम्ही तुमचे ऐकू. त्यावर तोडगा काढू. मोदी सरकार नेहमीच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीश उभं आहे... हातरस असो, उन्नाव असो, ऑलिम्पिक महिला खेळाडू असो" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.