लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीमुळे थरथरत आहेत. म्हणून ते एकापाठोपाठ एक खोटं बोलत आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं असून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. "पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी थरथरत आहेत. त्यामुळेच ते एकापाठोपाठ एक खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे तर अब्जाधीशांचे नेते आहेत हे भारतातील जनतेला समजलं आहे, हे त्यांनाही माहीत आहे. भारतातील जनता संविधानाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे, हे त्यांना माहीत आहे. निवडणूक त्यांच्या हाताबाहेर गेली आहे हे त्यांना माहीत आहे.”
"इलेक्टोरल बाँड्समध्ये एवढी चोरी झाली आहे की निवडणुकीनंतर ते अडचणीत येतील. देशाच्या एक्स-रेबद्दल बोलताच नरेंद्र मोदी थरथरायला लागले. भीती वाटताच ते खोटं बोलायला लागतात ही त्यांची सवय आहे. ते कधी पाकिस्तानबद्दल बोलतील तर कधी चीनबद्दल. त्यामुळे एकामागून एक खोटं बोललं जात आहे. पण यावेळी बाहेर पडू शकणार नाहीत" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
"जातनिहाय जनगणना हा आपला संकल्प असून तो पूर्ण करणार आहे. या मार्गात कोणीही अडथळा बनू शकत नाही कारण हे त्यांचे राजकारण नसून लक्ष्य आहे. ओबीसी समाज विचारत आहे की राम मंदिर बांधले, पीएम मोदी हे अनुष्ठानात सहभागी झाले पण त्यात ओबीसी समाजाचा सहभाग का नाही?" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.