केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी यांनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे अपमान केला आहे. राहुल गांधींना इन्हौना आणि पन्हौना यातील फरक माहीत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"भाजपा सरकारच्या काळात अमेठीचा विकास झपाट्याने झाला. भाजपा सरकारने अमेठीतील जनतेला मेडिकल कॉलेज दिलं आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपाने अमेठीला सैनिक स्कूल देण्याचे काम हाती घेतले. राहुल गांधी खासदार असताना 15 वर्षांपैकी 10 वर्षे काँग्रेसचं सरकार होतं. असं असतानाही अमेठी विकासापासून कोसो दूर राहिलं."
"भाजपा सरकारच्या काळात नदीवर पूलही बांधला गेला आणि अयोध्या राष्ट्रीय महामार्गही बांधला गेला. कोरोना काळापासून आतापर्यंत भाजपाचे काम सर्वांनी पाहिले आहे. भाजपाच्या मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांना किसान सन्मान, मोफत रेशन, घरं आणि शौचालय मिळालं आहे. काँग्रेस सरकारमध्ये दलाल जनतेचा पैसा खात असत. विरोधी पक्षातील लोकही माझ्या घरी येऊन विकासाची मागणी करतात" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
आमदार सुरेश पासी म्हणाले की, "भाजपाच्या कार्यकाळात मुलींच्या शिक्षणासाठी कथौरा ग्रामसभेतच महिला डिग्री कॉलेज बांधले आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सद्भावना मंडप बांधण्यात येत आहे. तरुणांना तंत्रशिक्षण देण्यासाठी आयटीआय उभारले जात आहे. जिथे युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळू शकेल."