लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. आपल्या पक्षाच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळे दावे करत आहेत. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आरोग्य, संपत्ती आणि महिलांचं 'मंगळसूत्र' यावर जास्त भर दिलेला पाहायला मिळत आहे. आता काँग्रेसने जाहीर केलं आहे की, यावेळी त्यांचे सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील आणि कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारासाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही.
काँग्रेस पक्षाने मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी आम्ही प्रत्येक भारतीयाला 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देऊ, असे जाहीर केले असून आता कोणत्याही भारतीय महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारासाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही असंही म्हटलं आहे. राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हवाला देत म्हटलं होतं की, काँग्रेस महिलांकडून मंगळसूत्रही हिसकावून घेईल आणि घुसखोरांमध्ये वाटेल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर आपली निवडणूक आश्वासनं शेअर केली आहेत. "महागाई आणि बेरोजगारीच्या शिखरावर असलेल्या भारतात आज दरवर्षी 6 कोटींहून अधिक लोकांना एक मेडिकल बिल गरिबीत ढकलत आहे. महागडे उपचार, महागड्या चाचण्या आणि महागडी औषधे यामुळे सर्वसामान्य माणूस कर्ज आणि व्याजाच्या चक्रात अडकतो, ज्यातून बाहेर पडण्यासाठी वर्षानुवर्षे जावी लागतात."
"आम्ही प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देऊन असुरक्षिततेच्या या चक्रातून बाहेर काढू, असा आमचा संकल्प आहे. आता भारतातील कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारांसाठी तिचे 'मंगळसूत्र' गहाण ठेवावे लागणार नाही" असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.