Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे झाले असून, पाचव्या टप्प्यासाठी उद्या (20 मे) मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्यांतील लोकसभेच्या 49 जागांवर मतदान होणार असून, 695 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, या पाचव्या टप्प्यात राहुल गांधी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, चिराग पासवान आणि रोहिणी आचार्य यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पनाला लागले आहे.
राहुल गांधी :काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी वायनाडसह उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2004 पासून सोनिया गांधी या मतदारसंघातून सातत्याने निवडणूक जिंकत आल्या आहेत. मात्र आता काँग्रेसने राहुल यांना येथून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्या विरोधात दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे.
राजनाथ सिंह : केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे सलग तिसऱ्यांदा लखनौ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथून सपाने रविदास मेहरोत्रा यांना I.N.D.I.A आघाडीचे उमेदवार म्हणून तिकीट दिले आहे.
स्मृती इराणी : भाजपने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा राहुल गांधींकडून पराभव झाला होता, पण 2019 मध्ये त्यांनी विजय मिळवला. भाजपने यंदा स्मृती इराणींवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. तर, काँग्रेसने त्यांच्या विरोधात गांधी घराण्याच्या निकटवर्तीय केएल शर्मा यांना तिकीट दिले आहे.
ओमर अब्दुल्ला : नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. त्यांची मुख्य लढत पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद गनी लोन आणि अपक्ष रशीद यांच्यात आहे.
रोहिणी आचार्य : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य या सारण लोकसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार राजीव प्रताप रुडी यांच्याशी आहे, जे येथून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
पीयूष गोयल : भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्याशी आहे. पीयूष गोयल पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
चिराग पासवान : बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून चिराग पासवान निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे वडील दिवंगत रामविलास पासवान आठ वेळा येथून खासदार म्हणून निवडून आले होते. या जागेवरून आरजेडीने शिवचंद्र राम यांना उमेदवारी दिली आहे.
करण भूषण सिंह : भाजपने यूपीच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना तिकीट दिले आहे. त्यांची लढत सपा उमेदवार भगत राम यांच्याशी आहे.
श्रीकांत शिंदे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खा. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यंदा त्यांच्याविरोधात शिवसेना(उबाठा) च्या वैशाली दरेकर आहेत.