काँग्रेसचे नेते राहुल गांधी 30 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोहोचले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना लागू करू, असं त्यांनी सांगितलं आहे. "आम्ही गरीब कुटुंबांची यादी तयार करू. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. जेव्हा महिला सकाळी उठतील तेव्हा जादुने हे पैसे त्यांच्या खात्यात येतील" असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी संविधान हातात घेऊन हा जनतेचा आत्मा आहे. मला या सरकारला विचारायचं आहे की, आरक्षणाच्या विरोधात अग्निवीर योजनेचं खासगीकरण का केलं गेलं?, मला विचारायचे आहे की, किती शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली?, किती मजुरांची कर्ज माफ झाली? असंही म्हटलं आहे. अयोध्येतील प्रभू राम मंदिराबाबत राहुल म्हणाले की, "मंदिराच्या बांधकामाच्या वेळी बॉलिवूड कलाकार होते. पण देशातील एकही शेतकरी, गरीब मजूर किंवा दलित-मागासवर्गीय व्यक्ती दिसली नाही."
"राम मंदिर आणि संसदेच्या पायाभरणी समारंभाला आदिवासी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले नव्हते. नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीची अंमलबजावणी केली. त्यामुळेच आज देशात महागाईचा दर सर्वाधिक आहे. देशात महिलाही दिवसाचे आठ तास मजुरी करतात. मात्र इंडिया आघाडी सरकार पहिल्यांदाच महिलांना घरात काम करण्याचे पैसे देणार आहे."
"आम्ही तरुणांसाठीही वेगळी योजना आणू. मोठ्या उद्योगपतींची मुलं कंपन्यांमध्ये जाऊन अप्रेंटिसचं शिक्षण घेतात. ते सहा महिने काम करतात, वर्षभर काम करतात आणि त्यांना चांगले पैसे मिळतात. ते प्रशिक्षण घेतात. त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळते. इंडिया आघाडी सरकार हे जगातील पहिले सरकार असेल जे प्रत्येक ग्रॅज्युएटला अप्रेंटिसशिपचा अधिकार देईल."
"आम्ही खासगी क्षेत्रातही कायमस्वरूपी नोकऱ्यांची व्यवस्था करू. त्यांना खासगी नोकरीतही पेन्शन मिळेल. तरुणांना BHEL, इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांमध्ये, सरकारी कार्यालयात, सरकारी रुग्णालयांमध्ये, सरकारी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एक वर्षाच्या कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील. प्रशिक्षण मिळेल" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.