मनोज भिवगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, शिमला (मंडी-हिमाचल प्रदेश): हिमाचल प्रदेशातील चारपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या मंडी मतदारसंघात यावेळी बाॅलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आणि ‘राजा का बेटा’ विक्रमादित्य यांच्यात मुकाबला आहे. या लढाईत काँग्रेसचे राजकुमार की भाजपची क्वीन या दोघांपैकी कोण मंडीत विजयाचा झेंडा फडकविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील धार्मिक स्थळांमुळे मंडी शहर छोटा काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे राजा म्हणून प्रसिद्ध असलेले वीरभद्रसिंह यांच्या कुटुंबाने सहा वेळा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. दुसरीकडे बहुतांश वेळ मुंबईत घालविणारी अभिनेत्री कंगनासोबत त्यांचा सामना आहे. मंडी काँग्रेसचा गड राहिला असून, आतापर्यंत १५ पैकी १० वेळा काँग्रेसचा विजय झाला आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
कंगनाचा बहुतांश वेळ मुंबईत गेला आहे. निवडणुकीनंतर ती येथे थांबेल याबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करू शकली नाही.चुंकी रामपूर राजघराण्याचे विक्रमादित्य यांचे वडील सहावेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आई प्रतिमभासिंह विद्यमान खासदार ही जमेची बाजू. पर्यटन विकासासोबतच ८० टक्के नागरिकांचे शेतीवरील अवलंबितत्व व शेती विकासाचे मुद्दे प्रचारात चर्चेत राहिले.
- २०१९ मध्ये काय घडले?
रामस्वरूप शर्मा - भाजप (विजयी) - ६,४७,१८९ विरूद्ध आश्रय शर्मा - काँग्रेस (पराभूत) - २,४१,७३०