लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारादरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे. आंध्र प्रदेशातील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, देशात संसद आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, यामुळे खर्चाला आळा बसेल.
राजनाथ सिंह यांनी वन नेशन-वन इलेक्शन यासंदर्भात विधान केलं आहे की, "लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यापैकी आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत."
काय म्हणाले राजनाथ सिंह?
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, वन नेशन-वन इलेक्शनच्या मागे आमचे पंतप्रधान मोदी यांचा विचार असा आहे की, देशात वारंवार निवडणुका होतात आणि जनता निवडणुकीत तितकीच गुंतलेली राहते. त्यामुळे सारखा सारखा खर्च होतो. तसेच निवडणुका आल्या की आचारसंहिता लागू होते आणि विकासकामेही ठप्प होतात. ही समस्या सोडवण्यासाठी वन नेशन-वन इलेक्शन खूप चांगले माध्यम ठरेल, असा आमचा विश्वास आहे."
"यावेळेस आंध्र प्रदेशात संसद आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात आहेत, तर भविष्यात भारतातील सर्व निवडणुकाही एकाच वेळी घ्याव्यात, असा आमचा विचार आहे. आम्ही संसाधने वाचवू आणि वेळेची बचत करू शकू" असं देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. 13 मे रोजी येथील सर्व 25 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय आंध्र प्रदेशात विधानसभेच्या जागांसाठीही मतदान होणार आहे. सध्या आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आहे. भाजपाने येथे टीडीपी आणि जनसेना यांच्यासोबत युती केली आहे.