Rahul Gandhi On Debate With PM Modi: लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुका जसजशा पुढे सरकत आहेत, तसतशा नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही वाढले आहेत. या निवडणुकीदरम्यान दोन माजी न्यायाधीश आणि एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चर्चेसाठी एका व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण दिले असून, राहुल गांधी यांनीदेखील निमंत्रण स्वीकारले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायमूर्ती लोकूर, शाह आणि पत्रकार एन राम यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे. लखनौमध्ये एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी म्हणाले, 'मी 'लोकांच्या प्रश्नांवर' पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर समोरासमोर चर्चा करण्यासाठी 100% तयार आहे, परंतु मी त्यांना ओळखतो, ते माझ्याशी समोर येऊन चर्चा करणार नाहीत.' राहुल गांधी इथेच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, 'जर पंतप्रधानांना माझ्याशी चर्चा करायची नसेल, तर त्यांनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करावी.
काय आहे प्रकरण ?सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सार्वजनिक मंचावर चर्चेसाठी निमंत्रण पत्रे पाठवली होती. या पत्रात असे लिहिले आहे की, जनतेने दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप ऐकले, पण अर्थपूर्ण प्रतिसाद ऐकला नाही. पत्रात दोन्ही पक्षांना निमंत्रण स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.