पलटीबाज नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरणार? काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:16 PM2024-06-04T12:16:47+5:302024-06-04T12:17:40+5:30
Lok Sabha elections 2024 results BJP vs Congress: सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा या २८ ते ३० च्या आसपास आहेत.
सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजपा प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपा २८८ जागांवर आघाडीवर असली तरी बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. अशातच भाजपाच्या साथीला असलेले व कोणत्याही क्षणी या गोटातून त्या गोटात उड्या मारू शकणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
यामुळे या दोघांना संपर्क करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरु झाल्या असून या दोघांना चांगली ऑफर आली तर ते इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा या २८ ते ३० च्या आसपास आहेत.
जर भाजपाला काठावर बहुमत मिळाले तर हे दोघेच किंगमेकर बनणार आहेत. अशात ते काँग्रेससोबतही जाऊ शकतात, अशी शक्यता वक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून नितीशकुमार हे एनड़ीएच्या प्रचारात दिसले नव्हते. यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. परंतु काल नितीशकुमारांनी मोदींची भेट घेतली होती. यामुळे पलटूरामची ख्याती असलेले नितीशकुमारांनी एनडीएत चांगले स्थान मिळाले नाही तर राजकीय फायद्यासाठी कोणत्याही क्षणी विरोधकांच्या बाजुला उड्या मारू शकतात. असे झाले तर इंडी आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे.
सर्व प्रमुख पक्षांची राजकीय रणनीती वेगाने बदलू लागली आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला गुंतागुंतीच्या वाटाघाटी आणि धोरणात्मक आघाड्या बांधण्याची गरज आहे. तर काँग्रेसला या दोघांना फोडले तर सत्तेत जाण्याची संधी खुनावत आहे. यामुळे या दोघांशी फोनवरून संपर्क करण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले आहे.