लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यात मतदान झाल्यानंतर सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. याच दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा भाजपाच्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. संपूर्ण देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल असं म्हटलं आहे.
"आमचा लोकांवर विश्वास आहे, त्यामुळे भाजपा एकटीच देशभरात 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल" असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीच्या विजयाच्या दाव्यांवर देखील शिवराज सिंह चौहान यांनी भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीतही असे दावे केले होते, पण त्यानंतर सर्वांनी पाहिलं की भाजपाला जिंकायचं होतं, ती जिंकली आणि भविष्यातही जिंकणार आहे असं म्हटलं.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याबाबत राहुल गांधींनी केलेल्या विधानाबाबत शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "राहुल गांधी बिथरले आहेत. काँग्रेसला भारतीय संस्कृती, जीवनमूल्य, परंपरांशी काहीही देणेघेणे नाही. ते भारताच्या मुळापासून दूर आहेत."
"काँग्रेसचे नेते, त्यांचे सल्लागार म्हणतात की, काही लोक चीनसारखे दिसतात, तर काही नेपाळसारखे दिसतात. आम्ही सर्व भारतमातेचे पुत्र आहोत. भेदभावाचा प्रश्नच नाही. आम्ही सर्वजण एक आहोत. त्यांचा भारतीय मातीशी आणि लोकांशी काही संबंध नाही, यांची योग्य जागा भारत नाही तर इटली आहे" असं राहुल गांधी आणि काँग्रेसला टोला लगावत माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.