कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली तरी मी कधीही भाजपामध्ये प्रवेश करणार नाही असं म्हटलं आहे. लोकसभेचे उमेदवार एम. लक्ष्मण यांच्यासाठी मतं मागण्यासाठी जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित एससी-एसटी कार्यकर्ता आणि नेत्यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय ताकद तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याकडे वैचारिक स्पष्टता असते. लोकांनी भाजपा-आरएसएसच्या जाळ्यात अडकायला नको. आरएसएसच्या गर्भगृहात शूद्र, दलित आणि महिलांना प्रवेश नाही.
सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, "मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडेन, असे सांगणारे देवेगौडा आता मोदींशी आपलं अतूट नातं असल्याचं सांगत आहेत. राजकारण्यांमध्ये वैचारिक स्पष्टता असली पाहिजे. भाजपा आणि आरएसएस सामाजिक न्यायाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षण आवडत नाही. आरक्षण ही भीक नाही. हा शोषित समाजाचा हक्क आहे. जोपर्यंत समाजात जातीव्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षण टिकले पाहिजे."
"आता आरएसएसशी हातमिळवणी करणाऱ्या जेडीएसवर टीका करू नये का? काँग्रेसने अर्थसंकल्पात दलित लोकसंख्येनुसार निधीची तरतूद करण्याचा कायदा केला. आपल्या सरकारने 24.1 टक्के विकास निधी बाजूला ठेवावा असा कायदा केला आहे. हा पुरोगामी कायदा देशातील कोणत्याही भाजपा सरकारने लागू केलेला नाही, फक्त आमच्या काँग्रेस सरकारनेच केला आहे. या सर्व वस्तुस्थितीचे समाजाने भान ठेवायला हवे" असेही ते म्हणाले.
"आमच्या काँग्रेस सरकारने दलितांना कंत्राटात आरक्षण लागू केलं. मंडल अहवाल आणि मागासवर्गीय आरक्षणाला विरोध करणारा हाच भाजप नाही का? एससीपी/टीएसपी कायदा काँग्रेस सरकारने बनवला होता. त्यामुळे भावनिक चिथावणी देणाऱ्या आणि गरिबांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना पाठिंबा न देता काँग्रेसचे उमेदवार एम. लक्ष्मण यांना विजयी करा" असं आवाहन सिद्धरामय्या यांनी केलं आहे.