झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दुमका मतदारसंघातून उमेदवार घोषित झाल्यानंतर त्या रांची येथील भाजपा् मुख्यालयात पोहोचल्या. पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी JMM वर गंभीर आरोप केले आहेत. "झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)आपल्या तत्त्वांपासून दूर गेला आहे आणि भ्रष्टाचारात गुंतला आहे. झारखंडचा विकास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीमुळेच शक्य आहे" असं म्हटलं आहे.
सीता सोरेन यांनी दावा केला की, "भाजपा झारखंडमधील सर्व 14 लोकसभेच्या जागा जिंकेल आणि 'अबकी बार 400 पार' चं लक्ष्य पूर्ण होईल." सीता सोरेन यांनी 19 मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता. "माझे पती दुर्गा सोरेन जोपर्यंत पक्षात होते, तोपर्यंत JMM योग्य दिशेने जात होता, पण आता JMM आपल्या तत्त्वांपासून आणि धोरणांपासून दूर गेले आहे. JMM आता दलालांच्या हाती असून भ्रष्टाचारात गुंतला आहे."
"भाजपाने आता मोठी जबाबदारी दिली"
"माझ्या पतीने झारखंड आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु त्यांना योग्य सन्मान दिला गेला नाही. माझ्या पतीचा मृत्यू अजूनही आमच्यासाठी एक गूढ आहे. मी त्यांच्या मृत्यूची सतत चौकशी करण्याची मागणी केली होती परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नाही. भाजपाने आता मोठी जबाबदारी दिली आहे" असं सीता सोरेन यांनी म्हटलं आहे.
"झारखंडमधील सर्व 14 जागांवर कमळ फुलणार”
"मला पक्षात सहभागी करून संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. दुमका मतदारसंघातून निवडणूक कोणीही लढवली, तरी त्या जागेवरून माझा विजय निश्चित आहे. झारखंडमधील सर्व 14 जागांवर कमळ फुलणार आहे आणि हे माझे वचन आहे" असं देखील सीता सोरेन यांनी सांगितलं आहे.