अमेठी लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी स्मृती इराणी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान अमेठी मतदारसंघासह अनेक मतदान केंद्रांवर काँग्रेसने कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
"अमेठीतील पराभवाचं त्यांना एवढं दुःख का वाटतं? ते लोक म्हणायचे की, स्मृती इराणी यांची योग्यता नाही. जे लोक बूथ लुटायचे, ते एका सर्वसामान्य कार्यकर्तीकडून पराभूत झाले. 1990 च्या दशकात गांधी कुटुंबातील एका सदस्याने एका ज्येष्ठ पत्रकाराला सांगितलं होतं की त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते त्यांच्यासाठी बूथ लुटलात."
"न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट तुम्ही पाहू शकता. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी यांनी राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेसने 97 बूथवर कब्जा केला होता" असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
2014 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी राहुल गांधींच्या बाजूने 1,00,000 मते टाकली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुलायम सिंह यादव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सोनिया गांधींनी त्यांना राहुल गांधींच्या बाजूने 1,00,000 मते देण्याची विनंती केली होती असंही म्हटलं आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांवर सात टप्प्यात मतदान होत आहे.